ओस्ट्राव्हा – भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने चीनच्या शुआई झांगसह खेळताना ओस्ट्राव्हा ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यंदाच्या मोसमातील सानियाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.
सानिया व शुआई या द्वितीय मानांकित जोडीने या स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत केटलिन क्रिस्टियन व एरिन रूटलिफ या जोडीचा 6-3, 6-2 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या मानांकित क्रिस्टियन आणि रूटलिफ या जोडीला अंतिम सामन्यात आपला प्रभावही पाडता आला नाही.
सानियाचे हे आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांतील डब्ल्यूटीए स्पर्धेचे कारकिर्दीतील 43 वे विजेतेपद ठरले. यंदाच्या मोसमात अंतिम फेरीमध्ये खेळण्याची सानियाची ही दुसरी वेळ होती.
याआधी डब्ल्यूटीए 250 क्लीव्हलॅंड स्पर्धेत अमेरिकेच्या क्रिस्टिना मकहेलसह खेळताना तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.