यूएस ओपनमध्ये खेळणार
न्यूयॉर्क – करोनामुळे पहिल्यांदा स्पर्धेतून अंग काढून घेण्याचा निर्णय जाहीर करणारा सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविच याने आपला निर्णय फिरवला आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांमधील फरक कमी करण्यासाठी स्वार्थी निर्णय त्याने घेतला आहे.
करोनाचा धोका अमेरिकेत सर्वाधिक आहे. त्यामुळे या स्पर्धेतून फेडरर, नदाल अशा अव्वल खेळाडूंनी अंग काढून घेतले आहे. जोकोविचनेही पहिल्यांदा असाच निर्णय घेतला होता. मात्र, फेडररच्या 20 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकण्यासाठी जोकोविचला आणखी चार ग्रॅण्डस्लॅम विजयांची गरज आहे. त्याच्या नावावर सध्या 17 विजेतेपद आहेत. या स्पर्धेत हे दोघे अव्वल खेळाडू खेळणार नसल्याने ही स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी जोकोविचला मिळाल्याने त्याने आपला निर्णय फिरवत या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
गतविजेत्या राफेल नदाल याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच सर्वाधिक 20 वेळा ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवणारा फेडररदेखील गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. तसेच त्याने पुढील वर्षापर्यंत कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याने जोकोविचसाठी ही स्पर्धा खूपच सोपी ठरणार आहे. त्यामुळेच केवळ स्वार्थ समोर ठेवत जोकोविचने ही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आहे.