मार्सेल – रशियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव याने ओपन 13 टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवताना कारकिर्दीतील 10 वे विजेतेपद साजरे केले. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेइरी ह्युजेस हार्बर्ट याचा 6-4, 6-7, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला. हार्बर्ट खरेतर दुहेरीचा स्पेशालिस्ट खेळाडू मानला जातो.
मात्र, या स्पर्धेत त्याने एकेरीतही चमकदार कामगिरी केली होती. त्याने टेनिस समिक्षकांना आश्चर्याचा धक्का देत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, मेदवेदेवसमोर त्याचा अंतिम फेरीत टीकाव लागला नाही. मेदवेदेवने या विजयासह यंदाच्या मोसमातील पहिलेच विजेतेपद साकार केला. करोनाच्या धोक्यानंतर त्याने मिळवलेले हे पहिलेच विजेतेपद ठरले.
स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलत मेदवेदेवने टेनिस क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. मेदवेदेव हा इनडोअर टेनिस कोर्टवरचा स्पेशालिस्ट खेळाडू मानला जातो. त्याने आजवर मिळवलेल्या 10 आंतरराष्ट्रीय विजेतेपदांतील सहा विजेतीपदे इनडोअर स्पर्धेतील आहेत.