मुंबई : भारतातील दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे यांचं वयाच्या 82 व्या वर्षी सोमवारी (30 ऑगस्ट) निधन झालं. त्यांनी सुनिल गावस्करांपासून सचिन तेंडुलकर ते आता रोहित शर्मापर्यंत अनेक हिऱ्यांना प्रशिक्षण दिलं.
यानंतर सचिन तेंडुलकरने वासु परांजपे यांना आदरांजली देत आपली भावना व्यक्त केली. वासू सरांच्या जाण्यानं माझ्या स्वतःचा एक भाग हे जग सोडून गेलाय असं वाटत असल्याची भावन सचिनने व्यक्त केली. सचिननं ट्विट करत त्यांच्याविषयी आपल्या अनेक आठवणींनाही उजाळा दिला.
सचिन म्हणाला, “वासु सर हे मी आत्तापर्यंत काम केलेल्या प्रशिक्षकांपैकी सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक होते. ते माझ्या लहानपणापासूनच्या क्रिकेटच्या प्रवासाचे अविभाज्य भाग होते. ते अनेक प्रकारे माझे मार्गदर्शक होते. माझ्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात ते मला म्हणायचे, ‘तु पहिले 15 मिनिटे व्यवस्थित पाहिलेस, तर विरोधक तुला दिवसभर पाहत राहतील.’ ते ज्ञानी होते आणि त्यांच्यात खूप चांगली विनोदबुद्धीही होती. मी काही दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो, तर ते पहिल्यासारखेच विनोद करत होते.”
इंदोरमधील अंडर 15 नॅशनल कॅम्पमध्ये एकदा केअरटेकर त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले. मुलं रात्रीची टेनिस बॉलवर खेळत आहेत. यासाठी आपल्याला काही मदतीची गरज आहे, असं केअरटेकर वासू सरांना म्हणाले. यावर ‘ते मुलं आहेत आणि खेळणारच. तुम्हीही का त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण करत नाही’, असं म्हणत वासू सरांनी तात्काळ आपल्या खास स्टाईलमध्ये केअरटेकरलाच क्लिनबोल्ड केलं, असं सचिननं सांगितलं.
वासू सर चेहऱ्यावर हसू उमटेल अशा त्यांच्या अनेक आठवणी मागे ठेऊन गेले आहेत. त्यांच्या जाण्यानं मला माझाच एक भाग हे जग सोडून गेलाय असं वाटतं, अशीही भावना सचिननं व्यक्त केली.
I feel that a piece of me has left the world.
Rest in Peace Vasu Sir. 🙏 pic.twitter.com/0ynyJ7LQNu
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 30, 2021
वासू परांजपे कोण होते?
वासु परांजपे यांचा जन्म 21 नोव्हेंबर, 1938 रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1956 ते 1970 दरम्यान मुंबई आणि वडोदरा संघासाठी 29 प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या वासु यांनी 23.78 च्या सरासरीने 785 धावा केल्या होत्या. तर नऊ विकेटही मिळवल्या होत्या. त्यांच्या काळात ते मुंबईत दादर यूनियन संघासाठी खेळत. त्यावेळी त्यांचा संघ सर्वात ताकदवर संघ मानला जात. त्यांचा मुलगा जतिन परांजपे हा देखील भारतासाठी खेळला असून नॅशनल सिलेक्टरही राहिला आहे.
वासु यांनी भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावांचा यात समावेश आहे. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासू यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर रवी शास्त्री, विनोद कांबळी, अनिल कुंबळे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत ट्विट केलं.