प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -सिंहगड रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या उड्डाणपुलासाठी अखेर महापालिका प्रशासनाने निविदा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार या कामासाठी 37 कोटींचा खर्च अपेक्षित असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. तर या कामासाठी 25 सप्टेंबरपर्यंत निविदा भरण्यास मुदत देण्यात आली आहे. मुठा नदीवर बांधण्यात येत असलेल्या या पुलामुळे सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर ही दोन उपनगरे अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहेत. याशिवाय सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होणार आहे.
जोडरस्त्यासह सुमारे 350 मीटर लांबीच्या व 30 मीटर रुंदीचा हा पूल असून, 24 महिन्यांत त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे. कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता दरम्यानच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे विकास आराखड्यात हा पूल प्रस्तावित केला होता. मात्र पूल उतरण्याच्या ठिकाणच्या जागा खासगी मालकीच्या असल्याने भूसंपादनाअभावी पुलाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. सध्या सुमारे 95 टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आली असून, उर्वरित जागेसाठी एकूण सुमारे साडेसात कोटी रुपये मोबदला दिला जाणार आहे. त्यासही मान्यता मिळालेली असल्याने महापालिकेने या कामासाठीची तयारी केली असून, निविदा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे याच वर्षात हे काम सुरू होणार आहे.
गंगा भाग्योदय ते मंडई रस्त्याचे काम आवश्यक
महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या कामाला गती दिलेली असली तरी त्याच वेळी सिंहगड रस्त्याकडून या पुलाकडे जाण्यासाठी माणिकबाग येथील गंगा भागोदय ते सनसिटी रस्त्यापर्यंत डीपी रस्ता प्रस्तावित आहे, ह्युम पाइप कंपनीच्या जागेतून हा रस्ता असून, काही भागाचे भूसंपादनही झाले आहे. त्यामुळ, या पुलाचा वापर व्हायचा असल्यास गंगा भागोदय ते मंडईपर्यंतचा रस्ता तातडीने भूसंपादन करून पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. या पुलाचा वापर करायचा असल्यास सिंहगड रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांना संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे यावे लागेल.