पिंपरी – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिनी बनावटीच्या विद्युतमाळांबरोबरच भारतीय बनावटीच्या विद्युतमाळांना यावर्षी पहिली पसंती दिली जात आहे. त्यातही हाताने बनविलेल्या विद्युतमाळांना विशेष मागणी आहे.
दिवाळी सणानिमित्त विद्युत रोषणाई करण्यासाठी प्रामुख्याने विद्युतमाळांचा वापर केला जातो. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या वेळी विद्युतमाळांची आवर्जुन खरेदी केली जाते. चांगल्या दर्जाच्या आणि जास्त ब्राईटनेस असलेल्या हाताने बनविलेल्या विद्युतमाळांना चांगली मागणी आहे.
त्याशिवाय, रनींग लाईटिंग, रंग बदलणाऱ्या, रिमोटवर चालविण्यात येणाऱ्या विद्युतमाळांची प्रामुख्याने खरेदी केली जात आहे. 50, 80 आणि 100 बल्फमधील या आकर्षक विद्युतमाळा लक्षवेधक आहेत. चिनी बनावटीच्या विद्युतमाळा देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत.
मात्र, ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या विद्युतमाळांना नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. विद्युतमाळा या 100 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. रिमोटवरील विद्युतमाळांची किंमत मात्र जास्त आहे.
करोनाचा 50 टक्के “इफेक्ट’
करोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेले संकट यामुळे विद्युतमाळा विक्रीच्या व्यवसायावर 40 ते 50 टक्के परिणाम झाला आहे.