पिंपरी – भाडेकरू आणि घरमालकांमध्ये डिपॉझिटच्या पैशावरून वाद झाला. फ्लॅटमध्ये राहत असताना दिलेले डिपॉझिटचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या दोन भाडेकरूंनी मालकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 25) विशालनगर, पिंपळे निलख येथे घडली.
राहुलकुमार तेजेंद्रकुमार सिंग (वय 22, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमन अनिल श्रीवास्तव (वय 30), राहुल राय (वय 24, दोघे रा. विशालनगर, पिंपळे निलख) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अमन आणि राहुल हे दोघे फिर्यादी सिंग यांच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्या वेळी त्यांनी फिर्यादी यांना डिपॉझिट म्हणून काही रक्कम दिली होती. काही कालावधीनंतर आरोपींनी फिर्यादी यांचा फ्लॅट सोडला. त्यामुळे त्यांनी दिलेले डिपॉझिटचे पैसे फिर्यादी यांच्याकडे मागितले. त्यातील काही रक्कम फिर्यादी यांनी दिली होती. दीड हजार रुपये राहिले होते. ते पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.