लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने गोहत्या कायदा अधिक कडक केला आहे. यात तुरुंगवासात वाढ करण्यासोबतच गोवंशला हानी पोहचवणाऱ्यांनाही शिक्षा होणार आहे. गोहत्या केल्यास आता 3 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास तर गोवंशला शारीरिक इजा केल्यास 1 वर्ष 7 महिन्यांची शिक्षा होणार आहे. याबरोबरच गोतस्करी सारखे गुन्हे करणाऱ्यांचे फोटो सार्वजनिक केले जाणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट ऑनलाइन बैठक झाली. यात उत्तर प्रदेश गोवध निवारण (सुधारित) अध्यादेश, 2020 च्या मसुद्याला संमती देण्यात आली आहे.
आतापर्यंत गोहत्यासंबंधी गुन्ह्यांत सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. मात्र आता ही शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढवण्यात येऊन पाच लाख दंडाचीही तरतूद आहे. याबरोबरच गोतस्करीत समावेश असलेले वाहन चालक यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
गोवध निवारण कायदा 1955, उत्तर प्रदेशमध्ये 6 जानेवारी 1956 ला लागू करण्यात आला होता. त्यानंतर 1958, 1961, 1979 आणि 2002 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या.