सातारा -अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने अशोक शंकर माने (वय 25, रा. ढेण ता. पाटण) याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांनी हे आदेश दिले. या खटल्यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले.
या खटल्याची माहिती अशी अशोक माने याने जीवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. या अत्याचारामुळे ही मुलगी गरोदर राहिली होती. या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होत.े विशेष सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी वकील नितीन मुके यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.
या खटल्यामध्ये 13 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी माने याला अत्याचार प्रकरणी दोषी ठरवून पोस्को कलम 3 व 4 अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याच्या कामासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, प्रोसेक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. फरांदे, हवालदार शमशुद्दीन शेख, हवालदार गजानन फरांदे, सुधीर खोडे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, कॉन्स्टेबल अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी मदत केली.