नागठाणेत पाच तर भरतगाववाडीत एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
नागठाणे (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी आलेल्या अहवालामध्ये अतित गावात दहा तर नागठाणे येथे पाच आणि भरतगाववाडी येथे एक जण करोना पॉझिटिव्ह सापडल्याने संबंधित गावांमध्ये भीतीचे वातावरण असून करोनाची धास्ती कायम आहे.
सातारा तालुक्यामधील ग्रामीण भागातून करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढू लागला आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार नागठाणे परिसरातील गावांना करोनाने चांगलेच हादरे दिले. तालुक्यातील अतीत गावात एकाचवेळी दहा जणांना करोनाची बाधा झाली असून नागठाणेतही आणखी पाच करोनाबाधतांची भर पडली आहे. तसेच भरतगाववाडी येथील गर्भवती महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सोनापूरनंतर अतीत, नागठाणे गावात मोठ्या प्रमाणात बाधित सापडल्याने या गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात अतीत येथे 20, 33, 60 व 84 वर्षीय महिला तसेच 16, 36, 47, 51, 55 व 66 वर्षीय पुरुष अशा दहा जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नागठाणे येथे 14 व 15 वर्षांच्या युवती, 65 वर्षीय महिला, 11 वर्षांचा मुलगा व 20 वर्षाच्या युवकाला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सकाळी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने दोन्ही ठिकाणी धाव घेत बाधितांचा निकट संपर्कातील व्यक्तींना शोधण्यास सुरुवात केली तर महसूल विभागाने दोन्ही गावातील बाधितांचा घरापासूनचा आजूबाजूचा परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. भरतगाववाडी येथेही 37 वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.