विजयवाडा – करोना सेंटर बनवलेल्या हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दहा बाधितांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अंध्रप्रदेशात विजयवाडा येथे रविवारी पहाटे घडली. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधला. ट्विटरच्या माध्यामातून त्यांनी ही माहिती दिली.
विजयवाडातील करोना केंद्राला लागलेल्या आगीच्या घटनेने मला धक्का बसला असून यात आपल्या प्रीय जनांना गमावलेल्यांसोबत माझ्या सहवेदना आहेत. यात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. मुख्यमंत्र्यांसोबत मी याबाबत चर्चा केली असून त्यांना सर्व प्रकारच्या सहकार्य देण्याचे आश्वासन मी दिले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या निकटवर्तीयांना 50 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांन किेली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्यासोबतच दुर्घटनाग्रस्तांना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
हॉटेलच्या तळमजल्यावरील वातानुकुलीत यंत्रांमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे लागलेली आग हॉटेलमध्ये पसरली, असे पोलिसांनी सांगितले. किमान आठ बाधितांनी घाबरून टेरेसवरून उड्या मारल्या. त्यात ते मरण पावले. तर हॉटेलमध्ये मोठा धूर साठल्याने अन्य दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
येथे असणाऱ्या अन्य बाधितांना जवळपासच्या सरकारी रुग्णालायात हलवण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी इप्तियाझ अहमद यांनी सांगितले. अहमदाबाद येथील श्रेया हॉस्पिटला आग लागून त्यात आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे.