कॉंग्रेसच्या कार्यकाळापेक्षा दहापट विकास

पुणे – “गेली चाळीस वर्षे शहरात कॉंग्रेसची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. मात्र, त्यांच्या नेत्यांमधील भांडणामुळे शहराचा विकास खुंटला होता. मात्र, भाजपने गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसच्या दहा पट विकासकामे केली,’ असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख आणि आमदार विजय काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

तसेच “कॉंग्रेसकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने वैयक्तिक टीकेचा गल्लीतला खेळ केला जात असून विकासाच्या प्रश्‍नावर भाजप कोणत्याही चर्चेस तयार असेल,’ असाही दावा काळे यांनी यावेळी केला. रिपाइंचे प्रचार प्रमुख मंदार जोशी, शिवसेनेचे प्रचार प्रमुख राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते.

काळे म्हणाले, “गेली 40 ते 50 वर्षे कॉंग्रेसकडून पुण्याच्या विकासासाठी जे प्रस्ताव आणले जात होते, ते केवळ त्यांच्या जाहीरनाम्यावर होते. मात्र, भाजपने प्रत्यक्षात शहराच्या विकासाची पावले उचलली. कॉंग्रेसकडून कधीच शहर विकासाचा भविष्यकालीन दृष्टीकोन ठेवण्यात आला नाही. तसेच त्यांना नागरिकांना चांगल्या सुविधा तसेच चांगले प्रकल्पही देता आले नाहीत. मात्र, या उलट भाजपने गेल्या पाच वर्षांत शहराच्या पुढील 30 वर्षांच्या गरजांचा विचार करून विकासकामे प्रस्तावित केली आहेत. त्यात मेट्रो, रिंगरोड तसेच पीएमआरडीएचा समावेश आहे. शहराचा विस्तार, लक्षात घेऊनच हे नियोजन केले आहे. मात्र, त्यामुळे आता कॉंग्रेसची अडचण झाली असून कॉंग्रेसकडे गेल्या 40 वर्षांत केलेले एकही काम दाखविण्यासाठी नाही.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.