चीनकडून दहा हजार भारतीयांवर ठेवली जातेय पाळत

सरकारने या वृत्ताची दखल घेतली आहे काय? - कॉंग्रेस

नवी दिल्ली – चीनकडून भारतातील दहा हजार प्रमुख व्यक्तींवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे असे वृत्त प्रकाशित झाले आहे त्याबद्दल कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्यांनी आज सभागृहात चिंता व्यक्त केली. या प्रकाराची सरकारने नोंद घेतली आहे काय आणि जर घेतली असेल तर त्यावर काय उपाययोजना केली, असा सवाल कॉंग्रेस सदस्यांनी व्यक्‍त केला.

कॉंग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, राजीव सातव यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष नायडू यांनी संसदीय मंत्र्यांना या विषयाची संबंधित मंत्रालयाकडून माहिती घेण्याची सूचना केली. शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना वेणुगोपाल म्हणाले की एका राष्ट्रीय वृत्तपत्रात ही माहिती प्रसारित झाली असून राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर मामला आहे.

शेनजेन येथील एका तंत्रज्ञान कंपनीने हा प्रकार केला असून ही कंपनी चीन सरकारशी संबंधित आहे असेही या वृत्तात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिले. या कंपनीने भारतातील दहा हजार व्यक्ती आणि संस्थांचा डाटा आणि गोपनीय व्यक्‍तिगत माहिती संकलित केली आहे. त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, अनेक मुख्यमंत्री, खासदार आणि उद्योगपतींच्या नावाचा समावेश असल्याचे या बातमीत म्हटले असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.