अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी राज्यातील दहा हजार उमेदवार प्रतिक्षा यादीवर – दत्तात्रय भरणे

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

रेडा (प्रतिनिधी) – राज्यातील रिक्त पदांची अनुपलब्धता किंवा भरतीसाठी कमी उपलब्ध होत असल्याने,अनुकंपा तत्त्वावरील भरती बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे.सध्यस्थितीत 10 हजारावर उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. या सर्व उमेदवारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

अनुकंपा तत्त्वावरील भरती, स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य,प्रकल्पग्रस्त उमेदवार यांच्या भरतीच्या अनुषंगाने एका शिष्टमंडळांनी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली.यावेळी शिष्टमंडळाला राज्यमंत्री भरणे यांनी आश्वासन दिले आहे.आमदार प्रकाश आबीटकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टीकाराम करपते, गीता कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना न्याय देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे.त्या अनुषंगाने ही भरती जलदगतीने व्हावी.तसेच सध्याच्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेता यावे यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावा,असे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे या संदर्भात कोणीही चिंता करण्याची गरज नाही अशी ग्वाही राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

यावेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी विविध मागण्या सादर केल्या.उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत.त्यांना लवकरात लवकर सामावून घेण्यासाठी सन 2008 मध्ये राबवलेल्या कार्यपद्धतीनुसार परत एकदा निर्णय घेण्यात आला पाहिजे तसेच वयोमर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांऐवजी,अन्य वारसाला प्रतीक्षा यादीत घेण्यात यावे,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

त्यावर उमेदवारांना जलदरितीने सामावून घेण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळापुढे सादर करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा,त्याबाबत सरकार सकारात्मक विचार केला जाईल,स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य तसेच प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे,अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.