पिंपरी – स्त्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन महिला आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने स्त्रीमुक्ती परिषद आयोजित केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन करून स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने या स्त्रीमुक्ती परिषदेमध्ये ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा लता रोकडे होत्या. या सर्व ठरावांची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. या परिषदेला महासचिव सुधा रायन, गौरी शेलार, सचिव सुनीता शिंदे, शोभा जावळे, सहसचिव नंदा जाधव, उपाध्यक्ष निर्मला कांबळे, रेश्मा अत्तार, अर्चना गायकवाड, कोषाध्यक्ष शारदा बनसोडे, संघटक भारती मोहिते, विद्या तेलतुंबडे, अनुराधा सोनवणे व सुलक्षणा रायन पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
परिषदेत मंजूर करण्यात आलेले ठराव खालील प्रमाणे
1) 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन जाहीर करावा. 2) सरकारी आरोग्य सेवेत सुधारणा करून दरडोई दरवर्षी 1500 रुपये व एकूण 18000 कोटी रुपये करण्यात यावे. 3) केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत, भारतीय रेल्वेचे खासगीकरण रद्द करावे, शेतकरी मालाला हमीभाव मिळावा, कायद्यात तशी स्पष्ट तरतूद करावी. 4) स्त्रियांसाठी समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, समाजामध्ये बलात्कार विरोधी मूल्य रुजवून स्त्री-पुरुष समतेची संस्कृती निर्माण करण्याचा निर्धार ही स्त्रीमुक्ती परिषद करत आहे. 5) स्त्री अत्याचार प्रतिबंधासाठी तालुका शहर आणि जिल्ह्यात जिजाऊ स्त्री सुरक्षा पथक व अहिल्याबाई स्त्री सुरक्षा पथक स्थापन करावे. 6) शक्ती विधेयकाला विरोध. 7) देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणाऱ्या व गरीब जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध. 8) स्त्री मुक्ती परिषद केंद्र सरकारने आणलेल्या छठउ, छझठ कायद्यांचा जाहीर निषेध करीत आहे. 9) कामगार विरोधी विधेयक मागे घ्या. 10) सावित्रीबाई फुले जयंती केवळ शिक्षक दिवस जाहीर न करता महिला शिक्षक दिवस जाहीर करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध.