गेल्या 23 दिवसांत दहा खून

सप्टेंबर महिना ठरतोय दहशतीचा : पिंपरी-चिंचवडची क्राइम सिटीकडे वाटचाल

पिंपरी -पिंपरी चिंचवड शहराची क्राइम सिटीकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या 23 दिवसांमध्ये शहरात खुनाच्या दहा घटना घडल्या आहेत. तर गेल्या चार दिवसांमध्ये खुनाच्या सहा घटना घडल्या आहेत. वाढत्या खुनाच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सप्टेंबर महिन्यातील खुनाची पहिली घटना दोन तारखेला फुगेवाडी येथे घडली. रामन्न कटगी (वय 68, रा. फुगेवाडी) या सुरक्षारक्षकाचा पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी सोमनाथ म्हेत्रे याने त्याच्या मित्राने केला होता. खुनाची दुसरी घटना चार तारखेला बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. गणेश याड्रमी (वय 22) या तरुणाचा पूर्वी झालेल्या वैमनस्यातून सहा जणांनी चाकू व कोयत्याने वार करीत खून केला.

खुनाची तिसरी घटना सहा ताखरेला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सरला साळवे (वय 20, रा. मोशी) या डॉक्‍टर महिलेचा तिच्या तलाठी असलेल्या पतीने खून केला. त्यानंतर पतीने चिठ्ठी लिहून तिच्याशिवाय आपण जगू शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आरोपी पतीने आपली गाडी आणि मोबाइल कामाच्या ठिकाणी आळेफाटा येथे सोडून पळ काढला.

अद्यापही या आरोपीचा पोलिसांना ठावठिकाणा मिळालेला नाही. खुनाची चौथी घटना किवळे येथे 16 सप्टेंबर रोजी घडली. सौंदव सोमेऊ उराव (वय 40) या सुरक्षारक्षक महिलेचा चोरट्यांनी खून केला. या गुन्ह्याची उकल करण्यात रावेत पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.

खुनाची पाचवी घटना 20 सप्टेंबर रोजी निगडी येथे घडली. संपत गायकवाड (वय 45, रा. ओटास्कीम, निगडी) येथे भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून खून करण्यात आला. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. खुनाची सहावी घटना 20 सप्टेंबर रोजी घोराडेश्‍वर डोंगर येथे उघडकीस आली. या घटनेत एका महिलेवर तिच्या दिराने व दिराच्या मित्राने अत्याचार करून तिचा खून केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खुनाची सातवी घटना 21 सप्टेंबर रोजी चिखली येथे घडली. वीरेंद्र उमरगी (वय 42) यांचा खून पैशाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आरोपीच्या मागावर गेले आहेत. खुनाची आठवी घटना बाणेर येथे 21 सप्टेंबर रोजी घडली. पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने अच्युत भूयान (वय 38) याचा खून कमल शर्मा या मित्राने केला. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

खुनाची नववी घटना रावेत येथे 22 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. खैरूनवी नदाफ या महिलेचा तिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून रावेत येथे खून केला. आरोपीच्या शोधात रावेत पोलीस आहेत. तर खुनाची दहावी घटना डांगे चौक येथे 23 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. रोहन कांबळे (रा. धायरी, पुणे) या फिरस्ती कामगाराचा अज्ञात व्यक्‍तीने खून केला.

आठ महिन्यांत 48 खुनांच्या घटनांची नोंद
1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2021 या आठ महिन्यांच्या कालावधीत 48 खून झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. यापैकी 83 टक्‍के म्हणजेच 40 खुनांची उकल पोलिसांनी केली आहे. याच कालावधीत गेल्यावर्षी 44 खून झाले होते. त्यापैकी 98 टक्‍के म्हणजे 43 खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर फक्‍त सप्टेंबर 2021 मध्ये आतापर्यंत दहा खुनांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.