शिरूर – न्हावरे (ता. शिरूर) येथील मुक्ता चित्रे या महिलेवर 3 नोव्हेंबर रोजी झालेला हल्ला दुर्दैवी आहे. पीडित महिलेला महिला बालविकास खात्याच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तातडीने दहा लाखाची मदत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देणार असून, ही मदत दिवाळीच्या आत महिलेला मिळेल अशी ग्वाही जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
पुणे येथे एका मेळाव्यासाठी जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आले असता त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष पूनम तावरे यांनी या महिलेच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. यानंतर मंत्री बच्चू कडू यांनी तातडीने रात्री ससून रुग्णालय येथे जाऊन या महिलेची आस्थेने विचारपूस केली. तिची सर्व माहिती घेत पीडित महिलेची विचारपूस केली. या महिलेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या महिलेला सध्या आधाराची गरज असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला बालकल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तातडीने प्रस्ताव पाठवण्यात येईल. दिवाळीच्या आधी या महिलेला दहा लाखाची मदत मिळवून देणार आहे. यापुढील काळात या महिलेला सर्वतोपरी मदत करून आधार देण्याचे काम महाराष्ट्र सरकार व प्रशासन करणार असून, त्यासाठी शासकीय योजनेतून दर महिना एक हजार रुपये मिळून देणार आहे. तर महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी या महिलेला मिळणारी मदत तिला घरपोच करतील, असेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.
या महिलेच्या वेदना पैशाने कमी होणार नसले तरी आज तिला आधार देणे गरजेचे आहे. या महिलेचे सर्व पुनर्वसन महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने करण्यात येईल. कंत्राटी पद्धतीने तिला कुठे कामाला ठेवता येईल का, याचाही विचार केला जाईल, असेही मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.