अंधश्रध्दा निर्मूलन समितीची पुराव्यानिशी तक्रार
नगर – पुत्रप्राप्तीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले निवृत्ती देशमुख तथा इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अंधश्रध्रा निर्मूलन समितीच्या ऍड.रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे त्या वक्तव्याचे पुरावे सादर केले आहेत.
आता पुन्हा जिल्हा आरोग्य विभागाला याची पडताळणी करावी लागणार आहे. सम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका प्रवचनात केल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी करत आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.
यावर नगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीएनडी समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. पोलीसांच्या तपासात असा कोणताही व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध नसल्याचे समोर आले. याबाबत पोलीसांच्या सायबर सेलने आरोग्य विभागाला आपला अहवाल कळवल्याने इंदोरीकर महाराज यांच्यावरील बालंट टळले होते. मात्र आता अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या ऍड.रंजना गंवादे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे इंदोरीकर महाराजांच्या त्या वक्तव्याचे पुरावे दिले आहेत.
याबाबत दिलेल्या पत्रकात ऍड. गवांदे यांनी म्हटले आहे की,उरण तालुक्यातील इंचगिरी संप्रदायाच्या विद्यमाने 31 डिसेंबर 2019 ते 7 जानेवारी 2020 या दरम्यान हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दि. 2 जानेवारी रोजी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते.
या किर्तनात त्यांनी स्त्री संग बाबतचे वक्तव्य केल्याचे यूट्युब व टीकटॉक या सोशल मिडियावरून व्हायरल झाले होते. याबाबत महाराजांनीही एका दैनिकाला मुलाखात देताना मान्य केले होते. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासात तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्याने यूट्युबवरील व्हिडिओ काढून टाकण्यात आले.
मात्र मी संगमनेर येथील रहिवाशी असल्याने तेथे युट्यूबवर तो व्हिडिओ पाहिला व संबंधीत वर्तमानपत्रातील बातमीही वाचली आहे. असे ऍड. रंजना गवांदे यांनी या निवेदनात म्हटले आहे.