दहाच देश आणि म्हणे विश्‍वकरंडक

क्रीडाप्रेमींनी आयसीसी व बीसीसीआयला फटकारले

पुणे – करोनानंतर जगभरातील क्रिकेटला सुरुवात होत आहे. आयसीसीनेही बैठकीत येत्या तीन वर्षांतील मोठ्या स्पर्धांची घोषणा केली. क्रिकेटशौकिनांना येत्या तीन वर्षांत तीन विश्‍वकरंडक पाहण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र, ज्या स्पर्धेत जगातील केवळ दहाच देश सहभागी होतात तरीही त्या स्पर्धेला विश्‍वकरंडक संबोधले जाते, यावर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटनप्रमाणे जागतिक स्तरावर किमान 50 देशांना एकत्र आणा व मगच या स्पर्धेला विश्‍वकरंडक असे म्हणा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आयसीसीला ट्रोल करताना फटकारले आहे.
ऍथलेटिक्‍सला मदर ऑफ ऑल स्पोर्टस असे संबोधतात. तसेच अमेरिकन बेसबॉल, फुटबॉल व हॉकी या खेळात किमान 20 ते 50 अशा संख्येने देश सहभागी होत असतात. 18 व्या शतकापासून क्रिकेट सुरू झाल्याचे आयसीसी अभिमानाने सांगते. मात्र, इतक्‍या वर्षात जगातील केवळ दहाच देश खेळत असलेल्या स्पर्धेला विश्‍वकरंडक संबोधले जाते यापेक्षा मोठा विनोद नसेल, असाही खोचक टोला नेटकऱ्यांनी आयसीसीला हाणला आहे.

गेल्या काही वर्षांत आयसीसीशी आणखीही काही देश जोडले गेले आहेत. मात्र, 1975 सालापासून सुरू झालेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा किती देशांच्या संघात खेळवली जाते याचे आत्मपरीक्षण आयसीसीने करावे. जगातील अन्य देशांत क्रिकेटचा विकास करण्याच्या गप्पा आयसीसीने गेली अनेक वर्षे मारल्या आहेत पण विश्‍वकरंडक म्हणवल्या जात असलेल्या स्पर्धेत काहीवेळा 12 तर काही वेळा केवळ 10 देशच सहभागी होताना दिसत आहेत. भारतात हा खेळ धर्म मानला जातो. खरेतर राष्ट्रीय खेळ हॉकी असताना क्रिकेटकडे करोडो चाहते वळतात मात्र, अन्य खेळांना दिवाळखोरीतूनही बाहेर काढले जात नाही. जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयने देखील या खेळाच्या प्रसारासाठी काय केले तसेच आयसीसीनेही हा खेळ जगातील किमान 50 देशांत खेळला जावा व त्यातील किमान 30 देश एकाच स्पर्धेत खेळतील यासाठी कोणते प्रयत्न केले, अशी विचारणाही नेटकऱ्यांनी आयसीसीला तसेच बीसीसीआयला केली आहे.

तीन वर्षांत तीन विश्‍वकरंडक स्पर्धा

भारतामध्ये होणारी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार पुढील वर्षी होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियामधील रद्द झालेली टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा देखील 2022 साली खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच 2023 साली भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचेही बैठकीनंतर आयसीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुढील तीन वर्षांत तीन विश्‍वकरंडक स्पर्घा पाहायला मिळणार आहेत, असेही आयसीसीने जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.