पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सेंट्रल पोलच्या नावाखाली वितरित करण्यात आलेली रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल केली जात आहे. मात्र, दिवाळीमुळे नोव्हेंबरमध्ये ही रक्कम वसूल करू नये, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी विभागाचे कामकाज सोमवारपासून बंद ठेवत आंदोलन सुरु केली होते. अखेरीस कुलगुरूंनी नोव्हेंबरमध्ये वसुलीस स्थगिती दिली.
यूजीसी किंवा विविध संस्थांकडून विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या निधीमधील काही रक्कम सेंट्रल पोलच्या नावाखाली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वितरित करण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून सुरू होता.
मात्र, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सेंट्रल पोल अंतर्गत एकाही कर्मचाऱ्याला निधीचे वितरण करू नये, असा निर्णय घेतला होता. तरीही वित्त विभागाच्या प्रमुखांनी काही महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना सेंट्रल पोल अंतर्गत वितरित लाखो रुपये वितरित केले.
त्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देऊन वितरित केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वसुलीला सुरुवातही झाली होती. परंतु, दिवाळी असल्याने विद्यापीठाने वसुली करू नये, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला.
विद्यापीठाने वसुली करू नये, अशी मागणी केल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात गोंधळ निर्माण झाला. मात्र, केवळ दिवाळीनिमित्त वसुली होणार नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.