नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडिया कंपनीने कोरोनामुळे भारतात आलेल्या बेरोजगारीच्या संकटात थोडाफार मदतीचा हातभार लावला आहे. कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि जगभरातील इतर ग्राहकांनी कोणत्याही व्यत्ययाविना सेवा देता यावी म्हणून अॅमेझॉन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या नियुक्त्या ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.तसेच कंपनीचा असा अंदाज आहे की, पुढिल सहा महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे. पुढिल सहा महिन्यांच्या कालावधीत देशभराती काही शहरांमध्ये नव्या कामगाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. हैदराबाद, पुणे, कोईम्बटूर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदिगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये अॅमेझॉन नव्या कामगारांना रोजगार देणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 20 हजार पदांपैकी अनेक पदे अॅमेझॉनच्या ‘वर्चुअल ग्राहक सेवा’ कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास आहे. तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत. अॅमेझॉन इंडियाचे संचालक अक्षय प्रभु यांनी याविषयी माहिती दिली. ‘आम्ही सतत वाढणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी वाढत्या मागणीचे निरंतर मूल्यांकन करीत आहोत. पुढील सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या वाढेल असा आमचा अंदाज आहे, असेही त्यांनी म्हटले.