पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खूनप्ररकणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याला न्यायालयाने वैद्यकीय कारणासाठी अंतरिम जमीन मंजूर केला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी हा आदेश दिला. लोणी-काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही, एक महिन्यानंतर पोलिसांकडे स्वता:हून हजर होणे, या अटीवर 50 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
लोंढे याचा कट रचून खून केल्याप्रकरणी त्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संदर्भात पोलिसांनी एकूण 15 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा असा अर्ज जाधव याने ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. संदीप बाली आणि ऍड. हितेश सोनार याच्यमार्फत न्यायालयात दाखल केला होता. जाधव यास हृदयरोग असून मधुमेहाचा देखील त्रास आहे.
आरोपीचे डोळ्याचे कॅटरॅक्ट ऑपरेशन करावयाचे असल्याने व त्यास योग्य तो वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यास कायमचे अंधत्व येऊ शकते, अशी बाजू बचाव पक्षाच्या वतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात मांडली. तसेच आरोपीची दृष्टी कायमची जाऊ नये यासाठी त्यास वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा नैसर्गिक अधिकार असून त्यास तात्पुरता जामीन देण्याची विनंती न्यायालयास करण्यात आली. त्यावेळी न्यायालयास तात्पुरता जामीन देण्याचे अधिकार असल्याचे नमूद करत काही अटींवर हा जामीन मंजुर केला.