पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) गेल्या आठ दिवसांत शाळांमध्ये 11 हजार 670 मुलांनी तात्पुरते प्रवेश नोंदवले. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करून केवळ 1 हजार 436 प्रवेश निश्चित झाले.
करोनामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही “आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. एप्रिलमध्ये ऑनलाइन प्रवेशाची लॉटरी काढली. मात्र, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया थांबली होती. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने 11 जूनपासून प्रक्रिया सुरू झाली. 30 जूनपर्यंत प्रवेशासाठी मुदत आहे.
राज्यात 9 हजार 432 शाळांनी “आरटीई’ प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यात 96 हजार 684 जागा दर्शवल्या आहेत. यासाठी 2 लाख 22 हजार 584 अर्ज आले आहेत. 82 हजार 129 मुलांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे.
लॉटरीद्वारे निवड झालेल्या मुलांना आधी प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात 985 शाळांमध्ये 14 हजार 773 प्रवेशा जागा आहेत. त्यासाठी 55 हजार 813 अर्ज आले आहेत. त्यातील 14 हजार 567 मुलांना लॉटरी लागली आहे. आतापर्यंत 2 हजार 266 मुलांचे तात्पुरते प्रवेश झाले असून 141 जणांचे निश्चित झाले आहेत.