“मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याच ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार’; भाजप आमदाराचे खळबळजनक विधान

नवी दिल्ली: आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  त्यामुळे राज्यांसह देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार असल्याचे खळबळजनक विधान एका भाजप नेत्याने केले आहे.

सरधानाचे आमदार संगीत सोम यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. ते नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला साडेचार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सोम यांनी सदर दावा केला असून, अखिलेश यादव हे हंगामी हिंदू असल्याची टीका सोम यांनी केली आहे.

अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत. ते इथे चालणार नाहीत, भारतात प्रत्येकजण हिंदू आहे, मुस्लिमही हिंदू आहे, हिंदूही हिंदू आहे आणि हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. अखिलेश यादव सारखे लोक म्हणत आहेत की ते विश्वकर्मा मंदिर बांधतील, हे तेच लोक आहेत ज्यांनी राम भक्तांवर गोळीबार केला. ज्यांनी बनारसमध्ये साधूंवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले? हे लोक आता हात जोडून माफी मागत आहेत. पण लोक त्यांना माफ करणार नाही, अशी टीका करत भारतातील ज्या ठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी भाजपाकडून मंदिरे बांधली जातील. सपा प्रमुखांमध्ये हिंमत असल्यास, मथुरेतील मंदिरे पाडून तिथे मशीद बांधली गेली, असे बोलून दाखवण्याचे आव्हान सोम यांनी यावेळी दिले.

दरम्यान, उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन, असेच म्हटले आहे. तसेच आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, जो ट्रेंड सुरू आहे त्यानुसार, भाजपला ३५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असे म्हणत एकहाती सत्ता येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.