– भाविकांना सभामंडपात बसण्याची परवानगी नाहीच
पुणे – पाडव्यापासून मंदिर सुरू करण्यात येणार असून, यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात येत आहे. मंदिरे सोमवारी पहाटे सुरू होणार आहेत. मात्र, मंदिरात भाविकांना केवळ दर्शन घेता येणार आहे.
सण-समारंभांच्या दिवशी देवदर्शन घेण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे यंदा गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या मोठ्या सणांना देखील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मंदिरे खुली करण्याची मागणी करण्यात होती. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिरे खुली करण्याचे आदेश शासनाने दिले. या निर्णयाचे मंदिर प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत आहे.
करोनाच्या अनुषंगाने मंदिराच्या आवारात सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून, मंदिरांमध्ये सूचना फलक देखील लावले आहेत. तर मंदिरात गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन देखील मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.
शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची तयारी सुरू आहे. मास्क, सॅनिटायझेशन व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. सभामंडपात बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. शासनाने दिलेल्या निर्णयामुळे भक्तांचा पाडवा गोड झाला आहे.
– अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
देवदेवेश्वर संस्थानांच्या मंदिरांत पाडव्यापासून दर्शनासाठी खुली करणार आहोत. पाडव्याला सारसबागेतील तळ्यातील गणपती मंदिरात पाडव्याला दर्शनासाठी गर्दी होते. पाडव्याला मंदिरे सकाळी 5 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि पाडव्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिरे दर्शनासाठी खुली राहणार आहेत. सुरुवातीचे काही दिवस केवळ भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तीर्थ, प्रसाद देण्यात येणार नाही. यांसह मंदिर परिसरात सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.
– सुधीर पंडीत, प्रमुख विश्वस्त, देवदेवेश्वर संस्थान
करोना योद्धे पोलीस, डॉक्टर, महापालिकेचे कर्मचारी आदींच्या हस्ते आरती करून शुभारंभ करण्यात येणार आहे. नागरिकांना सभा मंडपात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. भाविकांनी हार, फुले, ओटी आणू नये. शासन नियमांनुसार दर्शन घ्यावे.
– ऍड. प्रताप परदेशी, विश्वस्त, महालक्ष्मी मंदिर, सारसबाग