मंदिरे ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत

डॉ. गो. बं. देगलुरकर : अनिल बळेल यांना स्नेहांजली पुरस्कार प्रदान

पुणे – देव-देवतांची मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशात अनेक मंदिरे अजूनही उभी आहेत. तसेच आज अनेक मंदिरे नव्याने उभी केली जातात. आपण मंदिरात दर्शनासाठी ज्या भावनेने जातो, त्याच भावनेने मूर्तीबरोबर देवळाची माहिती जाणून घेतली पाहिजे. मंदिराच्या प्रत्येक भागाला एक इतिहास असतो, असे मत मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

स्नेहल प्रकाशनाच्या अंजली घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा “स्नेहांजली पुरस्कार’ लेखक अनिल बळेल यांना डॉ. गो. ब. देगलुरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर, लेखक डॉ. मुकुंद दातार, विद्याधर ताठे, आशुतोष बापट, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्याधर ताठे यांचे संतकवी श्रीधरस्वामी, आशुतोष बापट यांचे सफर कंबोडियाची, डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी मंदिर कसे पहावे, बिंबब्रह्म आणि वास्तूब्रह्म या पुस्तकांचे प्रकाशन सोलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहल प्रकाशनाची वाटचाल अंजली यांनी घालून दिलेल्या पायावर सुरू आहे. स्नेहल प्रकाशनच्या माध्यमातून ज्या अंजली घाटपांडे यांनी साहित्य क्षेत्राला झळाळी मिळवून दिली. त्या महिलेच्या नावाने गेली सतरा वर्षांपासून साहित्य क्षेत्रातील साहित्यकाला पुरस्कार दिला जातो ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लेखक अनिल बळेल यांनी त्यांच्या लेखणीतून लहान मुलांना साहित्य निर्माण करून दिले आहे. अशा लेखकाला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हाच अंजली यांच्या कार्याचा गौरव आहे, असे सोलापूरकरांनी मनोगतात नमूद केले.

पुस्तक लेखनाचा प्रवास, स्नेहल प्रकाशनामधील आठवणींना मनोगतात बळेल यांनी उजाळा दिला. प्रकाशनाशी असणाऱ्या नात्यांमुळे हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो, असे बळेल म्हणाले. रवींद्र घाटपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दातार यांनी पुस्तकांची माहिती दिली. आसावरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.