चंपाषष्ठी उत्सव रद्द असतानाही खंडोबा भक्तांची दर्शनासाठी गर्दी
लोणी धामणी (पुणे)- तळी भंडार व खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट.., येळकोट येळकोट, जय मल्हार… या जयघोषणे धामणी येथील खंडोबा मंदिर परिसर दुमदुमून जायचा; मात्र सन 2020 चा चंपाषष्ठी उत्सव यास अपवाद ठरला आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्या वर्षी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुलस्वामी खंडोबाचा जन्मोत्सव (चंपाषष्ठी) कार्यक्रम सर्वच ठिकाणी रद्द करण्यात आला.
भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करता घरातूनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन मंदिर समिती व पोलीस प्रशानाने दिला; मात्र देऊळ बंद असूनही काही ठिकाणी दिवसभर भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत होती.
पुणे जिल्ह्यातील भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असणाऱ्या धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलस्वामी खंडोबा मंदिर सकाळी पूजा, अभिषेक, आरती व नवेद्य दाखवून शासन आदेशानुसार सकाळी बंद करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसल्याने दरवाजाबाहेर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. तसेच समूह संसर्ग टाळण्यासाठी भाविकांना सामाजिक अंतर व मास्कची सक्ती करण्यात आली होती. करोनाची भीती व सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द झाल्याने ह्यावर्षी नेहमीपेक्षा 50 टक्के भाविकांची गर्दी कमी होती. मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने दरवर्षी होणारी जागरणे ह्या वर्षी झालीच नाही. त्यामळे वाघे मंडळींना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. मंचर पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार तानाजी हगवणे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला तर सरपंच सागर जाधव व ग्रामस्थांनी मंदिर व्यवस्था पाहिली.
- शासन स्तरावर ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाची बैठक पार पडली. त्यामध्ये समूह संसर्ग टाळण्यासाठी मंदिर परिसरात जागरणे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी न करता दर्शन घेतले.
-प्रकाश पाटील, जीर्णोद्धार समिती प्रमुख खंडोबा देवस्थान धामणी - करोना महामारीने ह्या वर्षीचा चंपाषष्ठी उत्सव रद्द झाला. दरवर्षी मंदिर परिसरात ह्या दिवशी साडेसहाशे ते सातशे जागरणाचे कार्यक्रम होतात. आम्हा सर्व वाघे मंडळींच्या उपजीविका चंपाषष्ठी उत्सवाच्या कार्यक्रमावर अवलंबून असते; मात्र ह्यावर्षी मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
-दिनेश जाधव, शाहीर-वाघे मंडळी