पुणे – दिवसेंदिवस उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे नोंदवले आहे. त्यामुळे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत आणि किमान 16.9 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे.
कोमोरिन क्षेत्र ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असणारा उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा आता केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत (अंतर्गत कर्नाटकमार्गे) आहे. मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. विदर्भाच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली.
राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. तर, कोकण, गोव्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे 39.4 अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे 16.9 अंश सेल्सिअस नोंदवले आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरात उकाडा वाढत आहे. तर भर दुपारी उन्हाचा चटका लागत आहे. त्यामुळे आता रसवंती गृह, थंड पेयाची दुकाने, नीरा केंद्रांसह थंड पदार्थांना मागणी वाढत आहे. इतकेच नव्हे तर, सिग्नलला वाहनचालक सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र, कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान 17 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी सकाळी पुणे येथे 35.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 16.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे. तर लोहगाव येथे 35.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमान, पाषाण येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.