3.71 टीएमसी पाणी उपलब्ध : 100 टक्के भरले
धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले : शहराचा पाणी प्रश्न मिटणार
पाणलोट क्षेत्रात पावसाची दि. 1 जूनपासून आजपर्यंत 3 हजार 89 मिलिमीटर नोंद
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले टेमघर (ता. मुळशी) शुक्रवारी 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. 1 जूनपासून आजपर्यंत 3 हजार 89 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून 3.71 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे याआधीच भरली आहेत. मात्र, टेमघर धरण अजूनही भरले नव्हते. टेमघरचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. मात्र, पाणीसाठा सुरू केल्यावर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच टेमघर धरणातून गळती होत आहे. 2016 साली धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले.
पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेकंद 2 हजार 587 लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. गळतीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास शासनाने मान्यता दिली नव्हती. 2017 मध्ये धरण दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. धरण दुरुस्तीच्या कामांना यश आल्याने शासनाने यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार टेमघर धरण 100 टक्के क्षमतेने भरण्यात आले आले आहे.
परतीच्या पावसाने दिलासा
दि. 26 ऑगस्ट 2020 पर्यंत टेमघर धरणाच्या परिसरात 2 हजार 494 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. त्यावेळी धरणात 87.19 टक्के पाणीसाठा होता. ज्यावेळी टेमघर क्षेत्रात 3 हजार 200 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो. तेव्हाच धरण 100 टक्के भरते. परतीच्या पावसाने यंदा चांगली हजेरी लावल्याने धरण परिसरात पावसाचा येवा वाढला. त्यामुळे टेमघर धरण 100 टक्के भरले आहे.