पुढील टप्प्याच्या कामाला अद्याप मान्यता नाही : राज्य शासनाकडून मंजुरी देण्यास चालढकल
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येत आहे. असे असताना राज्य शासनाने धरण दुरुस्तीला सुधारित प्रकल्प मान्यता दिली नसल्याने हे काम थांबले आहे. मान्यतेशिवाय दुरुस्ती सुरू करता येत नाही. कामासाठी उन्हाळ्यातील फक्त तीन महिनेच मिळणार असल्याने शासनाकडून लवकर मान्यता मिळणे अपेक्षित आहे. जर मान्यता उशिरा मिळाली, तर धरण दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.
टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. यानंतर अवघ्या 15 वर्षांतच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. यानंतर धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठा असताना दुरुस्ती शक्य नसल्याने धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येते. त्यानंतरच दुरुस्ती केली जाते.
दरम्यान, ही दुरुस्ती मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग व ग्राऊटिंग या पद्धतीने धरणाबाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशांच्या कोनात ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडण्यात आले. यामध्ये सिमेंट, सीलिका, फ्लॅशसोबतच दोन द्रव पदार्थ अशा सहा पदार्थांचे मिश्रण प्रेशरच्या सहायाने सोडले जाते. यामुळे गळती थांबण्यास मदत होते.
धरण दुरुस्तीचे हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर, तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळा व अन्य कारणांमुळे हे काम थांबले होते. उर्वरीत 30 टक्के दुरूस्तीला जलसंपदा विभागाची सुधारित प्रकल्प मान्यता आवश्यक आहे. या मान्यतेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
…तर दुरुस्ती लांबणार
धरण दुरुस्तीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. वेळेत काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. कामगार, यंत्रसामग्री धरणावर ठेवल्या आहेत. मात्र, सुधारित मान्यताच मिळत नसल्याने हे काम सुरू करता येत नाही. उन्हाळा ऋतू संपण्यासाठी तीन महिने उरले आहेत. जर मान्यता मिळण्यास विलंब झाला तर धरण दुरुस्तीचे काम लांबणीवर जाऊ शकते.