पुणे : टेमघरही ओसंडून…,चारही धरणांतून विसर्ग सुरू : नदीकाठी सतर्कतेचा इशारा

पुणे – यंदाच्या पावसाळ्यात टेमघर धरण पहिल्यांदाच 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून 300 क्‍युसेकने पाणी वाहत आहे. दरम्यान पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे तीनही धरणांतून विसर्ग सुरू आहे.

हे पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवला असून धरणातून नदीमध्ये 11 हजार 491 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात एकूण पाणीसाठा 29.15 टीएमसी म्हणजे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सोमवारी दिवसभर या चारही धरणांच्या परिसरात संततधार सुरू होती.

खडकवासला धरणात दिवसभरात 11, पानशेत-27, वरसगाव-27 आणि टेमघर धरणात 45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1,155 क्‍युसेक, पानशेत पॉवरहाऊस आणि धरणामधून एकूण 3 हजार 580 क्‍युसेक, तर वरसगाव धरणातून एकूण 4,400 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे 100 टक्के भरल्याने तसेच विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुरुस्ती झाल्यामुळे गळती थांबली
टेमघर धरणाला दरवाजे नाहीत. धरण पूर्ण भरल्यानंतर भितींवरून पाणी वाहते. सोमवारी पहिल्यांदाचा सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यापूर्वी धरणातून गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

धरणाच्या भितींकडील बाजूचे दुरुस्ती पूर्ण झाल्याने गळती थांबली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेने भरले जात आहे. यापूर्वी धरणात सुमारे एक टीएमसी इतकाच पाणीसाठा ठेवण्यात येत होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.