तेलुगुने योद्धाला बरोबरीत रोखले
मुंबई – प्रत्येक क्षणाला रोमहर्षक ठरलेल्या लढतीत सिद्धार्थ देसाईने निर्णायक चढाईत सुमीतला बाद केले, त्यामुळेच त्याच्या तेलुगु टायटन्सला यु पी योद्धा संघास 20-20 असे बरोबरीत रोखले आणि प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात पहिली बरोबरी नोंदविली. अन्य लढतीत सूर गवसलेल्या यु मुंबा संघाने गुजरात फॉर्च्युनजाएंट्स संघाला 32-20 असा पराभवाचा धक्का दिला.
एनएससीआय क्रीडा संकुलात झालेली टायटन्स व योद्धा हा सामना सुरुवातीपासूनच चुरशीने खेळला गेला. या लढ्तीत पूर्वार्धातही 11-11 अशी बरोबरी होती. दोन्ही संघांनी प्रभावी चढाया व भक्कम पकडी करीत चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद दिला. सिद्धार्थ हा या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू आहे. ही निवड सार्थ ठरविताना त्याने सुरेख खेळ करीत 5 गुणांची कमाई केली. शेवटची चढाई बाकी असताना योद्धाकडे 20-19 अशी आघाडी होती. सिद्धार्थने एक गुण घेत संघाचा पराभव टाळला. अबोजर मिघानी व फरहाद मिलाहार्दन यांनी प्रत्येकी 4 गुण घेत त्याला चांगली साथ दिली.
या सामन्याच्या तुलनेत मुंबा संघाने गुजरातविरूद्ध वर्चस्व गाजविले. मध्यंतराला 9-7 अशी त्यांच्याकडे नाममात्र आघाडी होती. त्यावेळी हा सामनाही शेवटपर्यंत रंगतदार होईल असे चित्र होते. तथापि, उत्तरार्धात मुंबाच्या खेळाडूंनी चतुरस्त्र खेळ करीत आघाडी वाढविली. त्यांच्या आक्रमक खेळापुढे गुजरातचे डावपेच सपशेल अपयशी झाले.