आमदार अशोक पवार यांच्या नागरिकांना सूचना
शिरुर- शिरूर तालुक्यात ज्या भागात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या त्या भागात कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला आहे का नाही, याबाबत स्वतः पाहणी करावी व निकृष्ट दर्जाचे काम असेल ते त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी नागरिकांना केले.
शिरुर तालुक्यातील रस्त्याची सुरू असलेली कामे, प्रस्तावित कामे याबाबतचा आढावा व रस्त्याच्या कामांची पाहणी आमदार ऍड. पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. शिरूर तालुक्यातील रस्ते जास्त काळ टिकणारे असावेत, यासाठी नवनवीन तंत्रज्ञान कामामध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पाहणीनंतर पवार म्हणाले की, पुणे- नगर रस्त्यावर मेट्रोची गरज आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. शिरुर-न्हावरा कर्डे, चव्हाणवाडी, निमोणे, इनामगांव, तांदळी, अष्टविनायक रस्त्या याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी त्यांनी केली. ज्या ठिकाणी रस्त्याच्या कामासंदर्भात काही वाद असेल काही सूचना व प्रस्ताव असेल तर त्याबाबतची चर्चा पाहणीवेळी केले आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या लेनच्या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदल्याने धूळ व अन्य गोष्टीच्या त्रास नागरिकांना व रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशी व वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे अशा रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची बैठक घेण्यात येणार आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, बांधकाम विभागाचे अधिकारी सोनावणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील सर्व रस्त्यांची पाहणी आमदार पवार यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत केली आहे. ही कामे चांगली व्हावीत, यासाठी आमदार पवार यांनी सुरू केलेल्या पाहणीमुळे शिरूर शहरासह तालुक्यात दळणवळणाला मोठी मदत होणार आहे.