नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी मोदी सरकारला बदनाम करण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा डाव उधळून लावण्यासाठी अर्थसंकल्पातील महाराष्ट्राबाबत जास्तीत जास्त लोकांना सांगा, असा सल्लावजा निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मोदी यांनी आज गुरूवारी महाराष्ट्रासह देशभरातील भाजप खासदारांशी चर्चा केली. यात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील खासदारांचा समावेश होता. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. अशात, पंतप्रधानांनी राज्यातील भाजप खासदारांशी चर्चा केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचा अर्थसंकल्प सरकार बचाव अर्थसंकल्प असून त्यात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे, असा आरोप कॉग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांकडून केला जात आहे. जेव्हा की, महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद बजटमध्ये करण्यात आली आहे. भाजप खासदारांनी जास्तीत जास्त लोकांना भेटावे आणि बजटमधील सत्य लोकांना सांगावे, अशी सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत केली असल्याच समजते. नवीन खासदारांना त्यांचा आतापर्यंतचा संसदेतील अनुभव विचारला. बैठकीबाबत अधिकृतरित्या कुणीही बोलले नाही. मात्र सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी खासदारांना चांगले काम सुरू ठेवण्यास सांगितले आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचून बूथ बळकट करण्यास सांगितले. दरम्यान, काही खासदारांनी मतदान यादीतून मतदारांची नावे गहाळ झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांनी त्यांना या समस्येकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
माहितीनुसार, पंतप्रधानांनी खासदारांसोबतच्या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिकडेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी या भेटीत जवळपास ९० जागांची मागणी केली असल्याचे समजते. भाजपने लोकसभा निवडणुकीत फक्त नऊ जागा जिंकल्या. 2019 मध्ये 23 जागा जिंकल्या होत्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडची फक्त एक जागा जिंकली, तर शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने 100 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे, तर भाजपने 160 ते 170 जागांचे लक्ष्य ठेवले आहे.