पवारांना सांगा भाजपचे सरकार येणार आहे – चंद्रकांत पाटील

2024मध्ये चित्र बदलणार

बारामती – शरद पवारांना सांगा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे, अशी गर्जना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या जागेवर दावा करणे म्हणजे हवेचा दावा होईल. मात्र 2024 निवडणुकात बारामतीचे चित्र बदललेले असेल. कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता, 2024ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर कामाला लागा. बारामतीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बारामतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. कार्यक्रमास यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, रंजन तावरे, महानंदा चे संचालक दिलीप खैरे, प्रशांत सातव आदी मान्यवर उपस्थित होते

पाटील म्हणाले, बारामती लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरीची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ निवडणुकांच्या तोंडावर काम करून चालणार नाही. लोकसभा व विधानसभेला नेहमी असे झाले की दरवेळेस कोणीतरी नवीन माणूस दिला गेला. निवडणूक आल्यावरच प्रयत्न झाले. सातत्याने पाच वर्षे प्रयत्न केले तरच रिझल्ट मिळतात. इथून पुढील काळात बारामती करण्यासाठी भाजपच्या वतीने कामकाज केले जाणार आहे. त्यासाठी भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकरांना वाटायला हवे. त्यासाठी बारामती शहरात सुसज्ज अशा भाजप संपर्क कार्यालयाची निर्मिती केली आहे. कार्यालयाच्या माध्यमातून बारामतीचे नागरिक भाजपला जोडले जातील अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना कार्यालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा देखील मानस पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या छोट्या निवडणुकांतूनच माणसे जोडत आपल्याला पुढे जायचे आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या लोकसभेच्या निकालाच्या वेळेस खुद्द शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे विजयी होतील याची खात्री वाटत नव्हती, अशी लढत भाजपने दिली. असा दावा त्यांनी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मजबूर नाही तर मजबूत सरकार देण्याचा निर्णय आता लोकांनीच घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सातव यांनी तर स्वागत सुरेंद्र जेवरे यांनी केले

…तर 2014मध्येच भाजपचा खासदार असता
2014 च्या लोकसभा निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार असता तर विजय निश्‍चित होता. 2019च्या निवडणुकीत देखील पूर्ण ताकदीने प्रयत्न केले; मात्र यश आले नाही. इथून पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण कामगिरी करून भाजप बारामती लोकसभा विधानसभा तेवढ्याच ताकदीने लढवेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

आगामी काळात भाजप बदललेली दिसेल
बारामती शहरात भाजप संपर्क कार्यालय सुरू झाले असून आगामी काळात बारामतीतील भाजप ही बदललेली असेल. कार्यालयाच्या माध्यमातून वरिष्ठांनी ठेवलेल्या विश्‍वासाला कुठेही तडा जाणार नाही, अशा पद्धतीने कामकाज बारामतीतील भाजपा करेल असा विश्‍वास जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.

रासपच्या प्रदेश सचिव भाजपात
बारामतीतील भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य सचिव उज्वला हाके यांनी रासपला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. हाके यांच्यासमवेत सुनिता किरवे, विद्या हांडे, प्रेरणा सोनकवडे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.