नवी दिल्ली -करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्याविषयीची माहिती स्वत: मोदी यांनी ट्विटरवरून दिली. ट्रम्प यांच्याशी तपशीलवार आणि चांगली चर्चा झाली. करोनाविरोधी लढ्यासाठी पूर्ण ताकद लावण्याबाबत भारत आणि अमेरिकेत सहमती झाल्याचे मोदी यांनी म्हटले. करोनावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.
करोना फैलावामुळे संपूर्ण जगापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातून त्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी जग एकवटत असल्याचे चित्र आहे. मोदीसुद्धा विविध देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती आणि सहकार्याच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत आहेत.