दूरध्वनी ग्राहकांना दिलासा

दूरध्वनी सेवेबाबत ग्राहकांची नेहमीच तक्रार असते. आजच्या डिजिटायजेशनच्या जमान्यात कितीही अत्याधुनिक यंत्रणा असली तरी मानवी निष्काळजीपणाचा फटका ग्राहकांना बसत राहतो. बील भरूनही सेवा सुरळीत नसणे, वारंवार फोन खंडित होणे, आवाजात स्पष्टता नसणे यासारख्या तक्रारी सर्वसाधारण आहेत. काहीवेळी बिल वेळेवर भरूनही ग्राहकांचे कनेक्‍शन कोणतेही कारण न सांगता तोडले जाते. अशावेळी ग्राहकांस मनस्ताप सहन करावा लागतो. अलीकडेच अशा प्रकारणात ग्राहक मंचाने दूरध्वनीधारकाच्या बाजूने निकाल दिला आहे. हा निकाल टेलिफोन कंपनीसाठी सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

एकदा बीएसएनएलने बिल भरणा न केल्याच्या कारणावरून एका ग्राहकांचे कनेक्‍शन कट केले. त्यातून ग्राहकाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. टेलिफोन कंपनीकडून कनेक्‍शन तोडल्याविरुद्ध त्याने जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली. त्यात त्याने मानसिक त्रासाबद्धल तक्रार केली. यात ग्राहकाने म्हटले की, आपण नेहमीच बिलचा आगाऊ भरणा करतो. म्हणूनच अनेक वर्षापासून बीएसएनएलचा प्लॅन वापरत आहोत. असे असताना त्याचे कनेक्‍शन तोडण्यात आले. अर्थात यावेळी जिल्हा ग्राहक मंचात सुनावणीदरम्यान बीएसएनएलने आपल्या विभागाची कोणतीच चूक नसल्याचे सांगितले.

बिलिंग कॅम्प्यूटरच्या सॉफ्टवेअरमधील बदलामुळे बिलाची योग्य माहिती मिळू शकली नाही आणि परिणामी ग्राहकाचे कनेक्‍शन ऑटोमेटिक कट झाले. जेव्हा ग्राहकाकडून बिल भरले गेले, तेव्हा तातडीने सेवा सुरू झाली, असे बीएसएनएलकडून सांगण्यात आले. ग्राहक मंचाने दोघांची बाजू ऐकून घेतली. यावेळी ग्राहकाकडून कोणतेही बिल पेंडिग नसल्याचे आढळून आले. तसेच त्याने नेहमीच आगावू बिल भरल्याचे दिसून आले. यात टेलिफोन कंपनी आणि त्याच्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा दिसून आला. बिल वेळेवर भरूनही कनेक्‍शन कट करणे म्हणजे टेलिफोन कंपनीच्या सेवेत उणिवा असल्याचे ग्राहक मंचाला कळून चुकले. यासाठी कंपनीच जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. यावर बराच काळ सुनावणी चालली.

त्यानंतर ग्राहक मंचाने ग्राहकाच्या बाजूने निर्णय घेत बीएसएनएलला 2 लाख 51 हजार रुपयाची भरपाई आणि 11 हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचे सांगितले. जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयाविरोधात बीएसएनएलने राज्य ग्राहक मंचाकडे तक्रार केली. तेथेही बीएसएनएलची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर बीएसएनएल राष्ट्रीय ग्राहक मंचात गेले. तेथेही दोघांची बाजू ऐकून घेतली. तेथेही सेवेतील कमतरता आढळून आली. त्याचवेळी टेलिफोन कंपनीकडून करण्यात आलेले दावे पुरेसे नव्हते. तक्रारकर्त्याने आपला फोन किती दिवस बंद होता, हे सांगितले नसल्याचे टेलिफोन कंपनीचे म्हणणे होते. तसेच हा फोन स्वयंचलित यंत्रणामुळे कट झाल्याचे बीएसएनएलने ग्राहक मंचाच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रीय आयोगाने दोघांची बाजू ऐकून घेतली आणि 2 लाख 51 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच वेळेत भरपाई न दिल्यास नऊ टक्के व्याज देण्याचेही आदेश दिले.

– सूर्यकांत पाठक, अ.भा. ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×