तेलंगणातील विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

हैदराबाद – तेलंगणातील एका विद्यार्थ्याची अमेरिकेत काही समाजकंटकांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. साई तेजा नुकारापू असे या २२ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो तेलंगणातील खाम्माम जिल्ह्यातला रहिवासी होता. शिकागोजवळच्या एका गॅस स्टेशनवर तो काम करत होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी आज सांगितले.
शनिवारी पहाटेच्या सुमारास काही समाजकंटकांनी त्याला गोळ्या घातल्या, असे प्राथमिक माहितीचा हवाला देऊन भारत राष्ट्र समिती पक्षाचे विधान परिषदेतील आमदार मधुसूदन थाथा यांनी सांगितले.
ही घटना घडली तेंव्हा साई कामावर हजर नव्हता. पण कामावर असलेला मित्र काही कामानिमित्त बाहेर गेला असल्यामुळे तो काही काळासाठी मित्रांना मदत करण्यासाठी तेथे गेला होता, असेही थाथा यांनी सांगितले.
साई तेजा याने भारतातून बीबीएचे शिक्षण पुर्ण केले होते आणि तो अमेरिकेतून एमबीएचे शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना तो अर्धवेळ काम देखील करत होता. या प्रकरणी मदत करण्यासाठी तेलगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकाशी संपर्क साधण्यात आला असून साई याचा मृतदेह पुढील आठवड्यात भारतात आणला जाण्याची शक्यता आहे, असेही थाथा यांनी सांगितले.





