दिशा प्रकरणातील आरोपींचे मृतदेह 13 पर्यंत जतन करा

तेलंगणा उच्च न्यायलयाचे आदेश; पुढील सुनावणी गुरूवारी

हैदराबाद : येथील दिशा सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातलि आरोपींचे मृतदेह 13 डिसेंबरपर्यंत जतन करण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायलयाने दिले.

हैदराबाद येथे एका 26 वर्षीय महिला पशुचिकित्सकावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांना तपासासाठी नेत असताना त्यांनी पोलिसांकडील शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा मृत्यू झाला होता. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश आर. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या चकमकीत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आचरण झाले आहे का? अशी विचारणा करत खंडपीठाने या प्रकरणी सरकार पक्षाने पुरावे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अशाच स्वरूपाची याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल असून तिची सुनावणी बुधवारी होणार आहे. त्यामुळे या याचिकांची सुनावणी गुरूवारी घेण्याची मागणी ऍडव्होकेट जनरल बी. एस.प्रसाद यांनी केली. त्याला खंडपीटाने मान्यता देत पुढील सुनावणी गुरूवारी ठेवली.

मेहबूब नगर येथील रुग्णालयात मृतदेह एवढे दिवस ठेवण्याची सुविधा नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने मृतदेह हैदराबाद येथील गांधी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.

न्यायिकबाह्य पध्दतीने या आरोपींची हत्या केल्याचा आरोप करून सुमारे 15 संघटनांनी या चकमकीत सर्वोच्च न्यायलयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नसल्याचा आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.