हैदराबाद – युक्रेन मध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यानंतर तेथून वैद्यकीय शिक्षण अर्धवट टाकून मायदेशी परतलेल्या तेलंगणातील सुमारे सातशे विद्यार्थ्यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च राज्य सरकारतर्फे केला जाईल अशी महत्वपुर्ण घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
तेलंगणातील 740 विद्यार्थी नुकतेच युक्रेनहून परतले आहेत. देशातील सुमारे 18 हजारहून अधिक विद्यार्थी देशाच्या विविध राज्यांमध्ये परतले असून या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने असेच पाऊल उचलावे असे पत्रही आम्ही केंद्र सरकारला लिहीणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितले.
ही सारी गरीब किंवा मध्यमवर्गीय घरातील मुले आहेत. त्यांना तेथील शिक्षण अर्धवट सोडून परत यावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. या विषयी सार्वत्रिक ओरड सुरू असताना तेलंगणा सरकार मात्र त्यांच्या मदतीला धावले आहे.