Tejaswini Pandit । Raj-Uddhav Thackeray Alliance : सरकारने महाराष्ट्रातील हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर आयोजित विजयी मेळाव्यानिमित्त तब्बल 20 वर्षांनंतर आज (दि. 5) ठाकरे बंधू एकत्र, एकाच व्यासपीठावर आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत महाराष्ट्राला संबोधित केले.
यावेळी दोघांनीही भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारे देत मराठी भाषा, मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने न पाहण्याचा इशारा दिला. तसेच, यावेळी दोघांनीही आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आणि युती करण्याबाबत संकेत दिले.
या मेळाव्याला वेगवेगळ्या पक्षांचे नेते याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील या मेळाव्याला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना तेजस्विनी म्हणाली की, “आम्ही इथे मराठीसाठी आलो आहोत, मराठीचा जो विजय झाला आहे तो साजरा करण्यासाठी आलो आहोत, महाराष्ट्रात जी गोष्ट, जे दृष्य पाहायला आम्ही वर्षानुवर्ष आसुसलो होतो, ते दृष्य आज आम्हाला मंचावरती दिसलं आहे”. अशी भावना तिने बोलून दाखवली.
तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो..!
मराठी सिनेमांच्या संदर्भात जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात, पण जेव्हा मराठीचा विषय असतो किंवा पक्ष आवाहन करतो तेव्हा मोठ्या संख्येने मराठी कलाकार का सहभागी होत नाहीत? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी तेजस्विनीला विचारला.
याला उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली की, “मी माझ्यापुरतं बोलू शकते, मला पण हा प्रश्न पडला आहे की, असं का होत नाही. इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा मग का येत नाहीत, हे दुर्दैवी आहे. कलावंत म्हणून मला देखील प्रश्न आहे. पण मी स्वत:विषयी बोलू शकते, मी इथं आलीय हेच उत्तर आहे.”