मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्तीस्वरूप दुर्गेची उपासना करतो. मात्र, नवरात्रीचे हे मंगलमय दिवस दिवस सुरु झाले की अनेकांचं लक्ष अभिनेत्री तेजस्विनी पंडितकडे वळतं. दरवर्षी नवरात्रीच्या दिवसांमध्ये तेजस्विनी देवीच्या रुपात समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असते.
मोठ्या उत्साहाने ती या सर्व रुपाबाबत बोलत असते. त्यासंदर्भातील माहिती देत असते. 2018 पासून ती हे सगळे रुप साकारते. यंदा तेजस्विनी कोरोना संकटात लढणाऱ्या योद्ध्यांविषयी व्यक्त होताना दिसत आहे.
तेजस्विनी पंडितने आज देवीच्या रुपातील तिचा पाचवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती साक्षात अन्नपूर्णा बनली असून मुक्या प्राण्यांची काळजी आणि अन्न भरवताना दिसत आहे.
“विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना. मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना. आबाळ या जीवांची…आईस साहवेना. मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा”, अशी कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिली आहे.