काँग्रेससोबत तेजस्वी यादवही करणार पराभवाचे चिंतन

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आज एका वृत्तसंस्थेशी बोलताना लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाचे चिंतन करण्यासाठी आपल्याला काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी बोलाविण्यात आल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये बिहारमधील ४० जागांसाठी काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाने हातमिळवणी करत राष्ट्रीय जनता दलाला २० जागा, काँग्रेसला ९ जागा आणि उरलेल्या जागा इतर मित्र पक्षांना देऊ केल्या होत्या. मात्र भाजप, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पक्षाच्या महाआघाडीने बिहारमधील ४० पैकी ३९ जागांवर विजय मिळवत बिहारमध्ये राजद व काँग्रेसला अक्षरशः धूळ चारली होती. रालोसापाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह हे भाजपची साथ सोडत युपीएमध्ये सामील झाले मात्र याचा देखील कोणताच तोटा भाजप-जेडीयू-एलजेपी आघाडीला झाल्याचे दिसले नाही. बिहारमध्ये भाजपने सर्वाधिक १७, नितीशकुमारांच्या जेडीयूने १६, राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने ६ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला बिहारमध्ये केवळ एक जागा जिंकता आली.

लोकसभा निवडणुकांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रीय जनता दलाला बिहारमध्ये लोकसभेची एकही जागा जिंकता न आल्याने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकताना दिसत असून पक्षाचे आमदार महेश्वर यादव यांनी काही दिवसांपूर्वी पाटणा येथे एका जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन करत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच महेश्वर यादव यांनी तेजस्वी यादवांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत बिहार विधासनसभेतील आपले विरोधी पक्षनेते पद त्यागावे अशी मागणी देखील केली होती.

मात्र पक्षातील नेत्याने तेजस्वी यादव यांच्यावर प्रशचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यांचे बंधू व लोकसभा निवडणुकांपूर्वी राजद सोबत बंडाची भाषा करणाऱ्या तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी यांची बाजू घेत, ‘जर तेजस्वी यांच्या नेतृत्वावर कोणाला शंका असेल तर ते पक्ष सोडून जाऊ शकतात’ असं वक्तव्य केलं होतं.

याचं पार्श्वभूमीवर आता लोकसभा निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता न आलेल्या राजदच्या तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या निवडणुकांची करणीमिमांसा करणाऱ्या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं सांगितलं असून या करणीमिमांसा बैठकीनंतर त्यांची पुढील भूमिका काय असणार आहे हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1133692929850204160

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)