पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव कधीही त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवू शकणार नाहीत. त्याचे कारण यामध्ये सर्वात मोठा अडथळा स्वतः लालू यादवच आहेत. लालू यादव यांच्या पापांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात कधीही आदर मिळू शकणार नाही, असा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी केला.
पाटण्यातील पत्रकारांशी बोलताना सिन्हा म्हणाले की, बिहारी या शब्दाला शिवीगाळ या शब्दाचा समानार्थी शब्द करण्यात जर कोणी खलनायकाची भूमिका बजावली असेल तर ते लालू यादव आहेत. त्याच्या कुटुंबाचे प्रत्येक वर्तन आणि प्रत्येक कृती कुठेनाकुठे बिहारींना शरमेने मान खाली घालायला लावत असते. अशा मानसिकतेचे लोक बिहारींना अभिमान आणि आदर वाटावा असे नसतात आणि त्यामुळेच यातून सुटका मिळवण्याची गरज आहे व याची योग्य वेळ आता आली आहे.
बिहारमध्ये इफ्तार पार्टीच्या नावाखाली होणाऱ्या राजकारणाबाबत उपमुख्यमंत्री सिन्हा म्हणाले की, राजदचे लोक सनातन संस्कृतीपासून दूर गेले आहेत आणि ते इतर धर्मांचे ठेकेदार बनले आहेत. धर्माचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या व्यक्तीबद्दल काय म्हणता येईल? प्रत्येकाचा धर्म असतो. प्रत्येकाला धर्म पाळण्याचा अधिकार आहे. पण, जर एखाद्या व्यक्तीने धर्माच्या नावाखाली आपली मानसिकता प्रतिबिंबित केली तर त्याचे उत्तरही त्याला द्यावे लागेल.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पवित्र रमजाननिमित्त उपवास करणाऱ्यांना दावत-ए-इफ्तारसाठी आमंत्रित केले होते. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यासह मोठ्या संख्येने उपवास करणारे आणि मान्यवरांनी यात सहभाग घेतला.