शेवगाव (प्रतिनिधी) : अमरावतीचे तहलिसदार तथा शेवगावचे सुपुत्र संतोष काकडे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तालुक्यातील करोना योद्ध्यांसाठी उत्कृष्ठ दर्जाचे २५० एन -९५ मास्क पाठविले आहेत .
तहसिलदार काकडे हे सातत्याने विविध उपक्रमाद्वारे गावाशी जोडलेले आहेत . करोना महामारीत अमरावतीला जीवाची पर्वा न करता ते तेथे विविध आघाड्यांवर लक्ष देत आहेत. या काळात गावी येता येत नसले तरी आपल्या तालुक्यातील करोना योद्ध्यांना भेट देण्यासाठी त्यांनी येथील लोकमान्य हॉस्पीटलचे संचालक तथा त्यांचे स्नेही डॉ. गणेश चेके यांच्याकडे हे एन -९५ मास्क पाठविले आहेत.
काल रविवारी डॉ. चेके यांनी ग्रामिण रूग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिस ठाण्यात, डॉक्टर असोशिएशनला या मास्कचे वितरण केले असून आज तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना या मास्कचे वितरण केले आहे .
आपल्या जिद्दीने करोनाला रोखणे शक्य…
तालुक्यातील करोना योध्यासाठी तहसिलदार काकडे यांनी मास्क सोबत पत्र पाठविले असून त्यात, करोना महामारीच्या काळात स्वतःच्या कुटूंबाची व जीवाची पर्वा न करता उत्स्फुर्तपणे काम करणाऱ्या देवदूतां प्रति नतमस्तक होऊन आपल्या सारख्या योध्याच्या जीद्दीमुळे करोनाला परतवून लावण्यासाठी आपण निश्चीत यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे .