-->

तहसील कार्यालयाचे कामकाज निम्म्या कर्मचाऱ्यांवर सुरु

  • आठ पैकी चार पदे रिक्त : एक कर्मचारी रजेवर, एकाची नियुक्‍ती संजय गाधी योजनेच्या कामासाठी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा ताण आकुर्डी येथील तहसील कार्यालयाच्या कामकाजावर येत आहे. त्यात येथील कार्यालयात निम्मे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. दाखल्यांची मागणी, वसुलीचा ताण यासह इतर शासकीय कामांच्या व्यापामुळे कर्मचाऱ्यांवर तणाव वाढू लागला आहे.

कार्यालयातील तोकडया मनुष्यबळाचा फटका कामांना बसत आहे. परिणामी, नागरिकांची कामे वेळेवर होण्यास विलंब होत आहे. नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वादही विलंबामुळे वाढू लागले आहेत. त्यामुळे या रिक्त पदावर त्वरीत भरती करण्याची मागणी होवू लागली आहे.

वाढते काम, घटते मनुष्यबळ
गेल्या काही वर्षांपासून आकुर्डी येथील तहसील कार्यालयात सुमारे चार रिक्त पदे आहेत. येथे कामकाजासाठी आठ कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र, आजघडीला कार्यालयात 4 जणच कामावर आहेत. त्यापैकी एक जण रजेवर असल्याने पाच जणांचे काम तीन कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. त्यातच तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेसाठी स्वतंत्र कक्ष बनविण्यात आला आहे. या कक्षात एका कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यामुळे आठ जणांचे काम दोन ते तीन कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. त्यातच निवडणुका, करोनाचे अतिरिक्त काम या महसूल कर्मचाऱ्यांना करावे लागत असल्याने वाढते काम आणि घटते मनुष्यबळ अशी गंभीर परिस्थिती येथे दिसून येत आहे.

दर महिन्याला 23 हजार दाखले
आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात गेल्या काही वर्षापासून दाखल्यांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत महिनाकाठी सुमारे 23 हजारापर्यंत दाखले देण्यात येतात. त्याहून अधिक दाखल्यांचे अर्ज दाखल होतात. मात्र, येथील कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होत असल्याने कामावर ताण पडत आहे. विद्यार्थी, महिलांना दाखल्यांची नितांत आवश्‍यकता असल्याने ते प्रामुख्याने द्यावे लागतात. याचप्रमाणे 64 कोटी रुपयांचा वसुलीचे काम कार्यालयाकडून करण्यात येते. गौण खनिज कारवाई, जमिन महसूल ही कामे प्रामुख्याने करावी लागतात.

कार्यालय चालविणे झाले कठीण
संजय गांधी योजनेसाठी कार्यालयातून एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे इतर दाखले व महसूलाच्या कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर वाढत चालला आहे. त्यात राज्य शासनाकडून करोना डयुटी, निवडणूक कामांचा ताण पडत आहे. त्यामुळे शिल्लक कर्मचाऱ्यांवर हे कार्यालय चालवणे कठीण होत चालले आहे. याबाबत कार्यालय प्रशासनास विचारणा केली असता. रिक्त पदाबाबत वरिष्ठांनी आढावा घेतला असल्याचे सांगण्यात आले. यामुळे येथील रिक्‍त पदे लवकार भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.