आत्मनिर्भर भारत इनाव्हेशन चॅलेंज : अ‍ॅप सादरीकरणाला मुदतवाढ

आठ वर्गात 2,353 प्रवेशिका : छोट्या शहरांतूनही प्रवेशिका 

नवी दिल्ली :- अ‍ॅप क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत इनाव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले होते. भारतातील स्टार्ट अप्‌स आणि तरुणांनी सरकारची ही संकल्पना उचलून धरली आहे. या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रवेशिका आल्या आहेत. या सर्व बाबी पाहता प्रवेशिका सादर करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे.

या स्पर्धेसाठी आतापर्यंत 8 वर्गात 2,353 प्रवेशिका आल्या आहेत. तरुणांचा हा उत्साह पाहता यासाठी प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. ही स्पर्धा माय गव्ह पोर्टलवर आयोजित करण्यात आली आहे. या अगोदर सरकारने प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख 18 जुलै असल्याचे सांगितले होते. ती आता 26 जुलै करण्यात आली आहे.

चीनबरोबर सरहद्दीवर संघर्ष निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. देशांतर्गत अ‍ॅप विकसित व्हावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज जाहीर केले होते. एवढ्या कमी कालावधीमध्ये 1,496 प्रवेशिका या व्यक्‍तिगत पातळीवर आल्या आहेत. तर 857 प्रवेशिका या कंपन्यांकडून आल्या आहेत.

यातील 380 प्रवेशिका व्यापारासंदर्भातील आहेत. 286 प्रवेशिका आरोग्यासंदर्भात आहेत. 339 प्रवेशिका ई-लर्निंग संदर्भात आहेत. 444 प्रवेशिका सोशल नेटवर्किंग, 136 प्रवेशिका गेमिंग, 238 प्रवेशिका कार्यालयीन कामासंबंधातील आहेत. त्याचबरोबर 75 प्रवेशिका बातम्यासंदर्भात तर 96 प्रवेशिका मनोरंजनासंदर्भात आहेत. 389 प्रवेशिका इतर वर्गासाठी आहेत. यातील बरीच अ‍ॅप सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी शंभर अ‍ॅप एक लाख लोकांनी डाऊनलोड केली आहेत.

छोट्या शहरांतूनही प्रवेशिका… 

स्टार्ट अप्‌ मोठ्या शहरात एकवटले आहेत. त्यामुळे या प्रवेशिका मोठ्या शहरातून येतील असे गृहीत धरले गेले होते. मात्र, या प्रवेशिका छोट्या शहरातूनही आल्या आहेत. ज्या प्रवेशिका निवडल्या जातील त्यांना सरकार आणि भारतातील मोठ्या कंपन्या आपली उत्पादने विकसित करण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत देणार आहेत. त्यामुळे हे उद्योग छोट्या शहरात वाढतील आणि रोजगारनिर्मिती करतील अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.