महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची साथ – मुख्यमंत्री

  • कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप
  • शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ

मुंबई : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोना संकट काळात सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्त्वाचे आहे त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, हे शासन शेतकऱ्यांचे आशिर्वाद घेऊन दमदारपणे पावले टाकीत आहे. कोरोना काळात सर्वच जण घरी बसून काम करीत आहेत. शेतकऱ्याला मात्र प्रत्यक्ष शेतात राबावे लागतो. त्याच्यामुळे जगाला अन्नधान्याचा पुरवठा होतो. शेतकरी बांधव कुठल्याही संकटाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ…

महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. विकसित तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्याला दिली तर कमी जागेत भरपूर उत्पादन घेणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या शेतमालाला जगात बाजारपेठ आहे त्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे म्हणजे जे विकलं जाईल ते पिकवेल अशी धारणा ठेवून कृषी उत्पादन घेण्याचं आवाहन करतानाच विषमुक्त शेती उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा राज्य शासनामार्फत त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सेंद्रीय शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा…

गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचे महत्त्व पटवून देतांना सेंद्रीय शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी आपण तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रयोगशीलतेने शेतकरी काही नवीन उपक्रम राबवित असतील तर त्याला प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे, आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. कमी जागेत अधिक उत्पादन घेणारे, अत्याधुनिक पद्धतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेती करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्या या मेहनतीला शाश्वती देण्याचे काम करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेताच्या बांधावर जाऊन बोलणारा कृषीमंत्री….

मुख्यमंत्री म्हणाले की, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलणारा, बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानांवर धाडी टाकणारा कृषी मंत्री दादा भुसे यांच्यारुपाने राज्याला मिळाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.