तंत्रज्ञान प्रगल्भ झाले, तरी गुरूशिवाय पर्याय नाही : अजित पवार

गुरूजन गौरव सोहळा : डॉ. अवचट, मुक्‍ता मनोहर, लेफ्ट.जन. शेकटकर, ओमप्रकाश रांका यांचा सन्मान

पुणे- “नवीन तंत्रज्ञान म्हणून ही चांगली गोष्ट आहे. परंतु गुगल चांगलाच मार्ग दाखवील, असे नाही. गुगल ज्ञान, माहिती देईल; पण खरे गुरू आपल्याला ज्ञान आणि बुद्धिसोबतच भावनांक आणि योग्य दिशा देतात. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगल्भ झाले, तरी गुरूशिवाय पर्याय नाही. खऱ्या गुरूवर गुगल गुरू मात करू शकणार नाही,’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिंतामणी विद्यापीठातर्फे आयोजित गुरूजन गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर, व्यावसायिक ओमप्रकाश रांका यांना पवार यांच्या हस्ते गुरूजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पक्षाचे शहाध्यक्ष चेतन तुपे अध्यक्षस्थानी होते. प्रवक्ते अंकुश काकडे, मनसेचे नेते बाबू वागसकर, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, आमदार ऍड. जयदेव गायकवाड, माजी आमदार बापूसाहेब पठारे, महिला आघाडी शहराध्यक्ष स्वाती पोकळे आदी उपस्थित होते. दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, अभय मांढरे, हर्षवर्धन मानकर, युवराज रेणुसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अनिल अवचट म्हणाले, “अनेकांच्या वेदनांनी, दु:खांनी मला शिकवले आहे. त्यामुळे त्यांनाच मी गुरूस्थानी मानतो.’ मुक्ता मनोहर म्हणाल्या, “न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या महिला, हक्‍कांसाठी लढा देणाऱ्या मोलकरणी, महापालिकेची शान सांभाळण्यासाठी गटारात उतरणारा कर्मचारी हे सारे माझे गुरू आहेत.’ शेकटकर यांनी मुळा- मुठा नदीतील प्रदूषणाकडे लक्ष वेधत “राजकीय धुरणांनी नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन केले. ओमप्रकाश रांका यांनी उद्योजकता सांभाळताना आम्ही सामाजिक भान जपल्याचे नमूद केले. आप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक विशाल तांबे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)