बेंगळूरु : कथितपणे आईची हत्या करणाऱ्या आणि भावाला गंभीर जखमी करणऱ्या तंत्रज्ञ महिलेला आज अंदमान आणि निकोबार इथे अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त एमएन अनुछेत यांनी आज वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. पोलिसांनी या महिलेला स्थानिक न्यायालयात हजर केले आणि “ट्रान्झिट रिमांड’ची मागणी केली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
या हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट व्हायचा आहे. आरोपी महिलेला बेंगळूरुला आणल्यानंतरच तिची चौकशी झाल्यावर या हत्येमागील हेतू स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी महिला एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरी करते आहे. तिने सोमवारी तिच्या आईची भोसकून हत्या केली तर भावावरही तसाच प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर ती पळून गेली होती. तिच्या भावाला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या जबाबनुसार पोलिसांनी तपास करून या महिलेला अटक केली.